Thursday, July 2, 2009

बालपणीच काळ का सुखाचा?

आपण मोठे झाल्यावर, नोकरी-धंद्याला लागल्यानंतर जवळ-जवळ सगळेच जण असे म्हणत असतात "बालपणीचा काळ सुखाचा" आणि त्याला कारणही तसेच असते. लहानपणी कशाची चिंता नसते, महिन्याचे बजेट आखायचे नसते, कामावर वरिष्ठांची बोलणी खायची नसतात, कसलीच बंधन नसतात.पण सहजच विचार करताना मला काही गोष्टीची जाणीव झाली, अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपण लहानपणी करू शकलेलो नसतो, मग अशा गोष्टी, अशा इच्छा आपण मोठे झाल्यावर का नाही पूर्णं करून घेत.
अशाच गोष्टीची एक यादी:
१. खिशात जास्ती पैसे नाहीत म्हणून, शाळेच्या मधल्या सुट्टीत पाहिजे तेवढी चन्यामन्या बोरं घेऊ शकत नव्हतो.पण आज तर घेऊ शकतो ना? मग समोर चन्यामन्या बोरं विकणारा विक्रेता सहज आपल्या नजरे आड कसा होतो? का मी कामधंद्यात एवढे बुडलोय की मला ह्या सगळ्या गोष्टीचा विसरच पडलाय
२. बर्फाचा गोळा, त्यावर विविध रंग,सरबत टाकून उन्हाळ्यात विकत मिळणारा. त्या गोळ्यासमोर सगळे तुच्छ होते. तिच गोष्ट ५० पैशाला विकत मिळणारी, दुधात बुडवलेली कुल्फीची.आज मात्र आपण ह्या गोळेवाल्याला, कुल्फीवाल्याला नजरेआड करून स्वच्छतेच्या नावाखाली हॉटेल मध्येच आईस-क्रीम खाणे पसंत करतो.
३. परीक्षेच्या काळातही, खोकला होईल म्हणून, घरातून विरोध असताना कैरीच्या झाडावर चढून, धरपडुन कैऱ्या काढून तिखट मीठ लावून खायचो. आज मात्र कैरी बहुतेक वेळेस लोणच्यातून, किंवा पन्ह्यातूनच भेटीस येते.
कदाचित ह्यातले आपण काही केलेही असते.. पण मग घरातील वडिलधारी माणसे.. बस्स झाले आता.. तू काही लहान राहिला नाहीस. मोठा झाला आहेस वगैरे म्हणून आपल्याला थांबवतात. पुढे पुढे आपणही मग काही करण्यापूर्वी दहा दा विचार करतो.. कारण आता मी मोठा झालो आहे.
हे थोडे चुकीचे नाही का? कदाचित आपण येण्याऱ्या पिढीला प्रत्येक गोष्टीत त्यांच्या मोठेपणाची जाणीवच करून नाही दिली तर त्यांच्यातील ती निरागसता, तो बालपणा आयुष्यभर साथ देईल आणि या आणि अशा अनेक गोष्टी ज्या बालपणात केल्या त्याच त्यांना त्यांच्या मोठेपणी आणि आपल्याला आता ही करता येतीलच की.. मग फक्त बालपणाचाच काळ सुखाचा नाही होणार.. नाही का?
तुम्हाला आठवत आहेत का अजून अशाच काही गोष्टी?

No comments: